Colombia Plane Crash : कोलंबिया–व्हेनेझुएला सीमेवरील नॉर्ट दे सँटान्डर प्रांतात बुधवारी एक अत्यंत भीषण विमान अपघात झाला. सॅटेना एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने १५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत कोलंबियाच्या राजकीय क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅटेना फ्लाइट क्रमांक ८८९५ ने बुधवारी दुपारी कुकुटा शहरातून ओकानाकडे उड्डाण केले होते. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटांतच आणि ओकाना विमानतळावर उतरण्यापूर्वीच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क अचानक तुटला. संपर्क तुटताच प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली.
अनेक तासांच्या शोधानंतर, व्हेनेझुएलाच्या सीमेलगत असलेल्या दुर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगल परिसरात विमानाचे अवशेष आढळून आले. या विमानात १३ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स होते. दुर्दैवाने, या सर्वांचा अपघातात मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या अपघातात कोलंबियाच्या संसदेचे विद्यमान सदस्य डायोजेनेस क्विंटेरो तसेच आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. स्थानिक आमदार विल्मर कॅरिलो यांनी या घटनेला “अत्यंत भयानक दुर्घटना” असे संबोधत नागरिकांना संयम आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
अपघातस्थळ अत्यंत दुर्गम असल्याने खराब हवामान, उंच डोंगररांगा आणि दाट जंगलामुळे बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हेलिकॉप्टर आणि जमिनीवरील पथकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल किंवा इतर कोणते कारण होते का, याचा तपास सुरू असून संबंधित हवाई वाहतूक यंत्रणा आणि तपास संस्था सखोल चौकशी करत आहेत. चौकशी अहवालानंतरच अपघातामागील खरी कारणे समोर येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.