चालू वर्गात प्राध्यापकाची धक्कादायक हरकत! विद्यार्थिनीला लग्नाची मागणी, संतप्त विद्यार्थिनीचा चप्पलांनी प्रत्युत्तर; VIDEO व्हायरल

Viral video : कर्नाटकातील एका मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बंगळुरू ग्रामीण परिसरातील नेलमंगळाजवळ असलेल्या श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे एका प्राध्यापकाने वर्गातच विद्यार्थिनीला लग्नाची मागणी घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाने लेक्चरदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अचानक एका विद्यार्थिनीबद्दल प्रेम व्यक्त केले. त्यांनी संपूर्ण वर्गासमोर त्या मुलीला प्रपोज करत “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असे स्पष्टपणे सांगितले. हा प्रकार पाहून वर्गातील सर्व विद्यार्थी चकित झाले.

यावर संबंधित विद्यार्थिनीने तात्काळ विरोध दर्शवला आणि प्राध्यापकांना प्रश्न विचारले. त्यावेळी प्राध्यापकांनी दावा केला की, त्या मुलीने आधी त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले होते आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचेही सांगितले. मात्र, विद्यार्थिनीने पुरावा मागितल्यावर त्यांनी तो दाखवण्यास टाळाटाळ केली आणि नंतर तिथून निघून गेले.

ही घटना कॉलेजमध्ये वेगाने पसरल्यानंतर इतर विद्यार्थी संतप्त झाले. काही विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला जाब विचारत त्यांच्यावर हल्ला केला. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांकडून मारहाण होत असल्याचे दिसून येते. काहीजणांनी त्यांच्या गाडीपर्यंत पाठलाग करून त्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कॉलेज प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित प्राध्यापकाला निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शिक्षक-विद्यार्थी नात्याच्या मर्यादांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शैक्षणिक वातावरणात अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य असल्याची भावना व्यक्त होत असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Comment