देशातील गॅस संकटावर मोठा उपाय! 3 मिनिटांत सिलिंडर देणारे LPG ATM सुरू, नागरिकांना मोठा दिलासा

India LPG ATM – देशात एलपीजी एटीएमला सुरूवात झाली आहे. याद्वारे 3 मिनिटात सिलिंडर मिळणार आहे. 24 तास हे एटीएम सुरू असणार आहे. त्यामुळे गॅस संकटात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात काही काळ LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र आता नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि आधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे. गुरुग्राम येथे देशातील पहिलं LPG ATM सुरू करण्यात आलं असून, यामुळे ग्राहकांना काही मिनिटांत भरलेला गॅस सिलिंडर मिळू शकतो.

ही सुविधा Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) कडून पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून गॅस वितरण अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कशी आहे प्रक्रिया?

ही संपूर्ण प्रणाली अत्याधुनिक आणि पूर्णपणे ऑटोमेटेड आहे. ग्राहकाने मशीनवर जाऊन आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा, त्यानंतर OTP द्वारे ओळख पडताळणी केली जाते. पुढे रिकाम्या सिलिंडरवरील QR कोड स्कॅन करून UPI किंवा कार्डद्वारे पेमेंट करायचे. प्रक्रिया पूर्ण होताच मशीनमधून नवीन भरलेला सिलिंडर बाहेर येतो आणि रिकामा सिलिंडर आत जमा होतो.

नवीन सिलिंडरचे वैशिष्ट्य

या ATM मधून मिळणारे सिलिंडर पारंपरिक लोखंडी नसून कॉम्पोझिट फायबरचे आहेत. त्यामुळे ते खूप हलके, गंजमुक्त आणि स्वच्छ आहेत. साधारण लोखंडी सिलिंडर सुमारे 30-31 किलो वजनाचा असतो, तर हे नवीन सिलिंडर फक्त 15 किलोच्या आसपास असल्याने हाताळायला सोपे आहेत. याशिवाय त्यांचा पारदर्शक डिझाईन असल्यामुळे आत किती गॅस शिल्लक आहे हे सहज पाहता येते.

24×7 उपलब्धता

या LPG ATM चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते 24 तास सुरू असते. त्यामुळे ग्राहकांना गॅस संपल्यावर एजन्सीच्या वेळेची किंवा डिलिव्हरीची वाट पाहावी लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिटांत नवीन सिलिंडर मिळू शकतो. मशीनमध्ये एकावेळी सुमारे 10 सिलिंडर ठेवण्याची क्षमता आहे आणि स्टॉक कमी झाल्यास एजन्सीला आपोआप सूचना जाते.

भविष्यातील योजना

हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, येत्या काळात देशातील इतर शहरांमध्येही अशी LPG ATM सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे गॅस वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि ग्राहकाभिमुख होईल.

एकूणच, ही सुविधा ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत असून, भविष्यात गॅस मिळवण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते.

Leave a Comment