रेशनवर पुन्हा ‘रॉकेल’ मिळणार? स्वयंपाक गॅस टंचाईचा फटका; रेशनवर रॉकेल देण्याचा प्रस्ताव पुढे

Kerosene Return : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे देशात उद्भवलेल्या संभाव्य एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता रेशन दुकानांतून पुन्हा रॉकेल (केरोसीन) वाटप सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन’ने केंद्र सरकारला पत्र लिहून देशभरातील रेशन दुकानांसाठी रॉकेलचा कोटा पुन्हा मंजूर करण्याची विनंती केली आहे.

गरिबांसाठी ‘सुरक्षा कवच’ देण्याची मागणी

रेशन दुकानदारांच्या संघटनेने पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना या संदर्भात एक निवेदन पाठवले आहे. गॅस पुरवठ्यात व्यत्यय आल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांचे हाल होऊ नयेत, यासाठी रॉकेल हा एक उत्तम पर्यायी इंधन स्रोत ठरू शकतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.

२०२० पासून वितरण बंद

भारतात पूर्वी रेशन दुकानांतून स्वस्त दरात रॉकेल मिळत असे. मात्र, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’द्वारे गरिबांना गॅस जोडणी मिळाल्यानंतर आणि स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी २०२०-२१ मध्ये रेशनवरील रॉकेलचे वितरण अधिकृतपणे बंद करण्यात आले होते. मात्र, आताच्या युद्धजन्य परिस्थितीत ग्रामीण आणि निमशहरी भागातील कुटुंबांची चूल पेटती ठेवण्यासाठी रॉकेल पुन्हा उपलब्ध करून द्यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुरवठा साखळीतील अडथळ्यांची भीती

भारत आपल्या गरजेच्या ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी आयात करतो. पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता निर्माण झाली असून, इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी गॅस एजन्सींसमोर आधीच रांगा लागल्याच्या बातम्या येत असल्याने, रेशन दुकानदारांनी आगाऊ खबरदारी म्हणून ही मागणी केली आहे.

Leave a Comment